स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी भगिनी व बंधुंनो
सस्नेह नमस्कार,
दीपस्तंभ फाउंडेशन 2005 पासून गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण,आदिवासी, दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध प्रकल्प व उपक्रम राबवित आहे. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, संवेदनशील, धाडसी अधिकारी घडावेत हे उद्दीष्ट आहे.
स्पर्धा परीक्षांचे आव्हानात्मक क्षेत्र आपण निवडले आहे. विविध स्तरावरील शासकीय पदे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भरली जातात. मात्र आज विद्यार्थी सर्वच परीक्षा एकाचवेळी देण्याचा अट्टाहास करताना दिसतात. यामुळे निश्चित ध्येय ठरविल्याशिवाय यश मिळत नाही. त्यासाठी नेमकी कोणती परीक्षा द्यायची ते निश्चित करा.
याकरीता खालील निकष तपासून पाहा.
1) आपली शैक्षणिक पार्श्वभूमी
2) शालेय जीवनापासून अभ्यासाची सवय
3) अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता.
4) मार्गदर्शनासह आर्थिक उपलब्धता.
5) परीक्षेच्या निकषानुसार वय.
6) तुच्याकडे उपलब्ध असलेला वेळ.
या आधारे परीक्षा निश्चित करा. फक्त इच्छा, तुलना, पदाचे आकर्षण, पालकांचा आग्रह (स्वप्न) यानुसार परीक्षा (ध्येय) ठरवू नका. भोळ्या आशेवर यश मिळत नाही. स्वप्नांबरोबर वास्तवतेचे भान असायला हवे. बर्याचदा विद्यार्थी ‘क्लास-1’साठी तयारी केली तर ‘क्लास-2’चे पद तरी मिळेल असाही विचार करतात. असे करू नका. जे पद मिळवायचे त्यावरच लक्ष केंद्रित करा. अंदाजे आशा बाळगून अपघाताने यश कधीच मिळत नाही. त्यासाठी...
• निश्चित ध्येय • सुयोग्य मार्गदर्शन • शिस्तबद्ध नियोजन • कठोर अंलबजावणी • चुकांतून शिकणे
...आवश्यक असते. याद्वारेच यश मिळते.
काय आवडते आणि काय शक्य आहे यापेक्षा यशासाठी काय आवश्यक आहे त्याचा विचार करा व कृती करा. अभ्यासक्रम व पदासाठी स्वतःला घडविणे व लायक बनविणे यासाठी स्वतःची ओळख बदलण्याची तयारी व कठोर परिश्रमांची आवश्यकता असते.
पुस्तके सर्वांना उपलब्ध असतात, मार्गदर्शनही अनेकांना मिळते, परंतु त्याचा उपयोग आपण किती व कसा करतो यावर यश अवलंबून असते. पुस्तके, मार्गदर्शक तुम्हाला दिशा व पद्धत समजावून सांगतात. मात्र तुम्ही किती समजावून घेतात, किती नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण परिश्रम घेतात, आत्मविेशास व धैर्याने टिकून राहतात त्यावर तुमचे यश अवलंबून असते.
तुम्ही या क्षेत्रात का येऊ इच्छिता? ‘मोठ्या’ अधिकार्यांपेक्षा ‘चांगल्या’ अधिकार्यांची समाजाला आवश्यकता आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा, गाडी, बंगला, नोकर यासाठी या क्षेत्रात येऊ नका. निराश व्हाल किंवा चुकीच्या मार्गाला लागाल. गर्व, अहंकार, अतिआत्मविेशास, स्वार्थ, भ्रष्टाचार यामुळे ‘कुंपणच शेत खात आहे’ अशी परिस्थिती झाली आहे. अनेकांना शासकीय अधिकार्यांची नोकरी प्रतिष्ठित रोजगार हमी योजना वाटते. खरं तर ज्यांना समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी कृतिशील योगदान द्यायचे आहे, ज्यांना इतरांचे दुःख आपले दुःख वाटते, ज्यांना आव्हाने पेलण्यात आनंद वाटतो, ज्यांच्या गरजा मर्यादित आहेत, अशा चांगल्या अधिकार्यांची संख्या वाढली पाहिजे. अशाच व्यक्ती आनंदाने, समाधानाने या क्षेत्रात करिअर यशस्वीपणे घडवू शकतात.
आपले ध्येय निश्चित असेल व त्यामागील उद्दीष्ट स्पष्ट व उदात्त असेल तर यशस्वी होण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण करु शकतो. अभ्यासाच्या नियोजनाबाबत ....
• संपूर्ण अभ्यासाचा आवाका समजून घ्या.
• वेळेनुसार, विषयावरून, महिन्यानुसार बारकाईने काटेकोर नियोजन करा.
• नियोजनाचे तक्ते, डायरी तयार करा.
• मागील प्रश्नपत्रिकांचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण करा.
• परीक्षाभिमुख प्रश्नांचा नियमित सराव करण्यासह विश्लेषणही करा.
• विषयनिहाय 1 किंवा 2 पुस्तके वापरा. आवश्यक घटकांच्या त्यातून नोट्स काढा.
• Group discussion ने अभ्यास करा. त्याचेही शिस्तबद्ध नियोजन करा. आठवड्यातून किमान एक-दोन वेळा आवश्यक.
• आपल्या दैनंदिन अभ्यासाचे feedback घ्या. analysis करा.
थोडक्यात स्वतःच्या अभ्यासाचा नियमित हिशेब घ्या. चुकांधून धडा शिका व दुरुस्ती करा. चांगला माणूस व उत्तम अधिकारी होण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
... यजुर्वेंद्र महाजन
(सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ञ)