ग्रामीण युवा प्रेरणा केंद्र

वाचनातून समृद्ध होणारा, थोरांच्या मार्गदर्शनातून शिकणारा, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासोबत आपल्या गावाचाही विकास साधणारा, स्वतःतील क्षमता ओळखून सकारात्मक, रचनात्मक व प्रेरणादायी कार्य करणारा, भारतीय संस्कृतीचे आचरण करणारा, उज्वल करिअर घडविणारा, सुशिक्षित स्वावलंबी युवा घडावा यासाठी त्यांना प्रेरणा देणारा असा हा एक अभिनव उपक्रम.

दीपस्तंभ फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त दि २४ व २५ एप्रिल २०१० रोजी जळगाव जिल्यातील चोपडा, लासूर, ऐनपूर, वाघोदा, चहार्डी (चोपडा), पिंप्री (धरणगाव) व भातखेडा (एरंडोल) या ठिकाणी ग्रामीण युवा प्रेरणा केंद्र सुरु करण्यात आले असून गेल्या दोन वर्षात या सर्व केंद्राचे काम अत्यंत जोमाने सुरु आहे.

खेडे हे केंद्रबिंदू मानून विध्यार्थ्यांसाठी व समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणाऱ्या स्थानिक उत्साही व्यक्ती या सर्व केंद्राची जबाबदारी सांभाळीत आहेत. यात प्रामुख्याने शिक्षकांचा सहभाग आहे. त्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था, ग्रंथालय, व प्रतिष्ठित दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. इयत्ता १० वी व त्यापुढील विद्यार्थी, विद्यार्थिनी आठवडयातून एकदा २ तासांसाठी एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी होतात. लोकसहभागातून एक चांगले ग्रंथालय प्रत्येक केंद्रात सुरु करण्यात आले असून प्रेरणादायी व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षासंदर्भातील पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत.

उपक्रमाचे स्वरूप

दीपस्तंभ ग्रामीण युवा प्रेरणा केंद्राच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना वार्षिक किमान देणगी रु १०० आहे गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश मिळतो.

आठवड्यातून एक दिवस, दोन तास एकत्रीकरण व बैठक
१. पुस्तकांची देवाण घेवाण
२. प्रार्थना ५ मिनिटे
३. प्रबोधनपर माहिती
४. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा
५. किमान २ विद्यार्थ्यांचे सादरीकरण
६. आठवड्यातील महत्वाच्या सत्य घटना
७. प्रेरणादायी गोष्ट
८. नवीन करिअरबद्दल माहिती
९. गावातील व्यक्तीचे अनुभव कथन - १० मिनिटे
१०. प्रश्नोत्तेरे - शंकासमाधान
११. कार ध्यान धारणा - १० मिनिटे

सर्व केंद्रामध्ये महिन्यातून एकदा तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान / मार्गदर्शन व प्रेरणादायी, माहितीपर चित्रपट दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो. सर्व केंद्रामध्ये स्वयंस्फुर्तीने कार्यरत असणाऱ्या शिक्षण, कार्यकर्ते यांचे वर्षातून एकदा जळगाव येथे एकत्रीकरण करून विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यात येते. या उपक्रमाची संकल्पना प्रा. यजुर्वेंद्र महाजन व प्रा. महेश गोरडे यांची असून त्यास डॉ. के.बी.पाटील, प्राचार्य नीलकंठ गायकवाड, श्री सुधीर महाजन, भालचंद्र पाटील, श्री. भरत अमळकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.